पहिली गं भुलाबाई...


 महाराष्ट्र हे शेतीप्रधान, कृषीप्रधान राज्य आहे. शेती ही तर अगदी अनादी कालापासून केली जाते, त्यामुळेच शेती आणि लोकजीवन, लोकसंस्कृती या एकमेकांना फार पूरक गोष्टी आहेत. त्यातही महाराष्ट्रातील लोकजीवन, लोकसंस्कृती, कृषीसंस्कृती ही फार वैशिष्टय़पूर्ण, वैविध्यपूर्ण श्रीमंत आणि विविधांगी आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रांतात भौगोलिक विविधतेमुळे लोकसंस्कृती, कृषीसंस्कृतीमध्ये, लोकजीवनामध्ये वैविध्य आढळून येते. त्यामुळेच महाराष्ट्राच्या कृषीसंस्कृतीची श्रीमंती फार अनोखी आहे. 
विदर्भात साजरा होणारा भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी आनंदाने साजरा केला जातो. विदर्भासह हा भुलाबाईचा सण मराठवाडय़ाच्या विदर्भालगतच्या काही जिल्ह्य़ांसह खान्देशातील जळगाव जिल्ह्य़ातपण साजरा होतो. भोंडला, भुलाबाई, हादगा या वेगवेगळ्या नावाने लोकपरंपरा पाळत असल्याचे दिसतं. मात्र भुलाबाईच्या उत्सवाची श्रीमंती ही विदर्भात फार जास्त पाहायला मिळते. 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील काही भागातील प्रसिद्ध लोक कथागीत महोत्सव म्हणजे भुलाबाई हा होय. भाद्रपद पौर्णिमेपासून शरद पौर्णिमेपर्यंत चालणारा हा महोत्सव सुमारे एक महिना साजरा केला जातो.

भुलाबाई म्हणजे माहेरवाशीण. एक महिन्याकरिता ती आपल्या माहेरी येते. तिचा हा सण, भुलाबाईसोबत भुलोजी आणि गणेश यांची महिनाभर लहान मुली घरोघरी स्थापना करतात. माहेरवाशीण भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे भोळा सांब असलेला शंकर आणि लहानसा असलेला गणेश म्हणजे गणपती. शेतकरी घरांमध्ये भुलाबाईचा हा उत्सव सखी पार्वतीचा उत्सव म्हणूनही लहान मुलींमध्ये ओळखला जातो. भुलाबाईचा हा उत्सव वैदर्भीय लोकसंस्कृतीचा, लोकपरंपरेचा अभ्यंग ठेवा आहे. 

काही वर्षापूर्वी या उत्सवाची कथा एका लेखात वाचली होती. एकदा शंकर पार्वती सारीपाट खेळतात सारीपाटाच्या डावात पार्वती जिंकते आणि शंकर पार्वतीवर रुसून निघून जातात, पार्वती  मग भिल्लीणीचे रूप घेऊन त्यांचा शोध घेते. शंकर भिल्ल रूपात तिला भेटतात. इथल्या या भिल्ल शब्दाचा अपभ्रंश झाला आणि भिल्लीणीची भुलाबाई आणि भिल्लाचे भूलोजी झाले. भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यन्त घरोघरी भुलाबाई आणि भूलोजीचा मुक्काम असतो.  आणि त्यांच्या बरोबर असतो हळकुंड बाळा. भुलाबाई आणि भूलोजी म्हणजेच शंकर आणि पार्वती असं म्हणतात आणि हळकुंड म्हणजेच गणपती.  त्यांची स्थापना झाली की मग पुढे छान आरास मांडली जाते.संसाराशी निगडित आरास किंवा लहानमुलींच्या आवडी प्रमाणे सजावट केली जाते.  भुलाबाई देखील माहेरी येतात असं म्हणतात. आधीच्या काळात माहेरी येणाऱ्या माहेरवाशिणी आपल्या मैत्रिणींना आपले सासर कसे आहे?,सासरची मंडळी, त्यांचे स्वभाव, तिथले वर्णन गाण्याच्या माध्यमाने सांगायच्या. कारण त्यावेळी आज सारखे लगेच फोन करून मनातले सांगायची सोय नव्हती ना.

लहान मुली आणि लग्न झालेल्या मुलींसाठी भुलाबाई हा विशेष  उत्सव करायचे. यातूनच लहानमुलींना खेळीमेळीच्या वातावरणात लग्न व्यवस्थेची  पूर्वकल्पना देता येत असे.

महिनाभर छान गाणी गायची आणि धमाल मज्जा करायची विशेष सूट असायची. एरवी सातच्या आत घरात म्हणणाऱ्या आया देखील महिनाभर मज्जा करू द्यायच्या. लग्न झालेल्या मुलींना सासर बद्दल बोलता यावे, त्यांना होणारा त्रास, घुसमट दूर होऊन थोडा काळ गमती जमतीत  घालवता यावा म्हणून हे सण साजरे होत असतील अशी एक समज आहे.

कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी शेतकरी ज्वारीच्या धांड्यांनी अथवा उसाच्या खोंडांनी खोपडी सजवून त्यात भुलाबाईला बसवतात. या काळात खरिपाची पिके कापणीला येतात, यानिमित्ताने पार पडणारा भुलाबाईचा उत्सव हा नविन आलेल्या धान्याचे पूजन केले जाते.

खिरापत म्हणजेच खेळ खेळून, फेर धरून दमलेल्या लहान मुलींना वाटला जाणारा खाऊ. ज्यांच्याघरी भुलाबाई त्यांच्याघरी खिरापत असा एक अलिखित नियमच आहे. दरदिवशी वेगवेगळ्या घरात भोंडला खेळाला जात असल्याने या दिवसात खाण्यापिण्याची चंगळ असते.काही ठिकाणी पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2 अशा करत करत 9 व्या दिवशी 9 +1 (दसऱ्याची) खिरापत असते.

पूर्वीच्या काळी स्त्रियांना आपल्या रोजच्या कामातून विरंगुळा मिळावा म्ह्णून अशा प्रकारचे सण उत्सव साजरे केले जात होते. तर अलीकडे या परंपरेचा वारसा जपण्यासाठी अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मग यंदा तुम्ही सुद्धा हा भोंडला खेळणार ना?


Comments

Popular posts from this blog

जगन्नाथ मंदिराबद्दल आश्चर्यकारक तथ्य!