प्रेम म्हणजे काय असतं?

  

फेब्रुवारी महिना सुरू झाला म्हणजे तमाम प्रेमी जीवांना वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डे चे! कित्येक शतकं अगोदर रोमन सम्राटाच्या मनाविरुद्ध सेंट व्हॅलेंटाईन याने अनेक प्रेमी जिवांना लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले होते. लग्न केल्यामुळे सैनिकांचे मन आपल्या कामावरून उडते म्हणून रोमन सम्राटाने आपल्या सैनिकांवर  लग्न न करण्याची सक्ती केली होती . राजाज्ञा चे उल्लंघन केल्यामुळे  सेंट व्हॅलेंटाईन यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्रेमासाठी त्यांनी 14 फेब्रुवारीला हसत-हसत हौतात्म्य पत्करलं त्यांच्या स्मृतीसाठी म्हणून हा दिवस जगभर 'प्रेम दिवस' म्हणून साजरा करतात.

 सगळ्यात संस्कृतीमध्ये 'प्रेमाला' उच्च स्थान आहे. मग  ते प्रेमा आई-बाबांचे असु दे नाहीतर देव भक्ताचे असू दे, नाहीतर प्रियकर-प्रेयसीचे असू दे. पाडगावकरांच्या भाषेत म्हणायचे झाले तर म्हणता येईल,  'प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते'. प्रेम हे देण्याने वाढते. बळजबरीने मिळत नाही. खऱ्या प्रेमात स्वार्थ  नसतो.   प्रेम हे शरीरावर न करता नेहमी मनावर करावे. सत्यवान हा अल्पायुषी होता तरीही त्याला वरणारी सावित्री ,   क्षयरोगा  सारखा सोबती असताना पेशवा माधवरावांची मृत्युनंतर देखील साथ देणाऱ्या रमाबाई! 16000 बायकांसमवेत आपला नवरा स्वखुशीने वाटणारी रुक्मिणी! ज्योतिबा फुले  समवेत स्त्री शिक्षणाची वाट चालणारी सावित्रीबाई !छत्रपती शिवाजी महाराजांच्या  मोजड्या उराशी कवटाळत सती जाणाऱ्या महाराणी पुतळा ! लाडक्या पत्नीसाठी जगाला थक्क करणारा ताजमहालचा शहाजहान!  ही सगळी प्रेमाचीच  रूप आहेत. या सगळ्यांनी प्रेम केलं आणि आयुष्यभर, आयुष्याच्या नंतर देखील निभावलं. आजच्या या फास्ट जमान्यात असे निस्सीम प्रेम दुर्मिळच.  आज प्रेमाची परिभाषा बदलत आहेत सिनेमात नायिका कपडे  ज्या  वेगाने बदलते त्याच वेगाने आज माणूस आपल्या 'प्रेमाचा माणूस ' बदलतो .  या लोकांचे प्रेम हे 'गरम खिसा   आणि 'शारीरिक सौंदर्य' पाहून ठरतो  एक उर्दू शायर म्हणतो- 

 ' न पुछो मोहब्बत क्या होती है |

किसी की इबादत, किसी की बंदगी होती है |

 मोहब्बत जिने की आस होती है|

 मोहब्बत जिने की आस होती है |

किसी की जिंदगी, किसी की सांस होती है |

आज प्रेमाचा अर्थ बदलतो आहे. व्हॅलेंटाईन डे च्यादिवशी फुटाळा तलाव, वेस्ट हायकोर्ट  रोड , रेसिडेन्सी रोड येथे दरवर्षी हजारो युवक - युवती एकत्र येऊन आपल्या (अनोख्या ?)प्रेमाचे दर्शन घडवते . कित्येक तास वाहतुकीची कोंडी करतात . मुळात 'प्रेम' हा सार्वजनिक करण्याचा विषय नाही . ती दोन व्यक्तींची व्यक्तिगत बाब आहे . ण तरीही, आज लोक आपल्या प्रेमाला सार्वजनिक करण्यात धन्यता मानतात ,कारण आज गर्लफ्रेंड , बॉयफ्रेंड असणं हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे .पूर्वी फक्त मनावर प्रेम केलं जायचं. पण आज शरीरावर केले जाते .सिनेमा, मालिका यांमधून दाखवले जाणारे मोकळे स्वैर  वातावरण पाहून तरुण तसेच वागायला पाहतात. अभ्यास, करिअर करण्याच्या वयात शारीरिक आकर्षणाच्या मोहक फंदात पडतात आणि आपली उमेदीची वर्ष वाया घालवून बसतात , मग जेव्हा जाग येते वेळ कधीचीच निसटून गेलेली असते.

 पूर्वी प्रेमासाठी जीव देणारे नायक सिनेमा मध्ये दिसायचे तर आज प्रेयसी दुसऱ्या कोणावर प्रेम करते म्हणून तिचा जीव घेऊ पाहणारे नायक दिसतात . तिने प्रेमाला नकार दिला म्हणून तिच्यावर  ॲसिड फेकणारे, तिला जिवंत जाळणारे रोमिओ आपल्या पांढरपेशा समाजात मानाने वावरतात . निव्वळ वरच्या रंगावर  भुलणारे, शरीरावर प्रेम करणारे, या भावनेला चक्क प्रेम समजतात आणि एकतर्फी प्रेमात पडतात . नकार मिळाल्यावर असे हिंसक होतात पण मुळात प्रेमामध्ये हिंसेला स्थान नाही. प्रेम तुम्ही जेवढे द्याल तेवढे तुम्हाला मिळते. आजच्या संधीसाधू जगात, स्वार्थी लोकांच्या गर्दीत खरं प्रेम कस्तुरी सारखं दुर्मिळ असते. प्रेम तर खूप जण करतात पण ते नीट निभावणारे फारच थोडे असतात. संध्याकाळी कमळाच्या फुलाच्या पाकळ्या मिटतात, त्या वेळी भुंगा गुपचुपपणे फुलांमध्ये लपतो. रात्रभर मध प्राशन केल्यावर सकाळी पाकळ्या उघडल्यावर उडून जातो.  असे क्षणभंगुर स्वार्थी प्रेम नसावे  प्रेम करावे तर पतंगासारखे .ज्योतीवर झेप मारली तर आपला जीव जाणार आहे हे माहिती असून देखील तिच्या प्रेमाखातर पतंग आपला जीव गमावतो. म्हणून पतंगाचे  प्रेम सच्चे आहे. या व्हॅलेंटाईन डे ला एका गोष्टीची खूणगाठ बांधायला हवी .ज्या व्यक्तीवर प्रेम कराल त्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारा कारण प्रेमात पडण्यापेक्षा ते आयुष्यभर निभावणं हे सगळ्यात कठीण आहे. म्हणूनच गालिब म्हणतो-

 ये इश्क नही आसान इतना

 समझ लीजिये |

बस आग का दरिया है ,और डुब के जाना है |

हॅपी व्हॅलेंटाइन डे !!!              

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जगन्नाथ मंदिराबद्दल आश्चर्यकारक तथ्य!